रेडिओ विंगच्या कार्याची मशाल धगधगती ठेवा
- व्हॉईस ऑफ मीडिया रेडिओ विंगच्या नाशिक येथील राज्य अधिवेशनात मान्यवरांचा सूर
- विविध विषयांवर आणि ठरवांवर झाले मंथन
- १० लाख रुपयांच्या विमा प्रमाणपत्रांचे वितरण
व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या देशव्यापी संघटनेच्या रेडिओ विंगचे अधिवेशन नाशिक येथे पार पडले. अत्यंत दिमाखदार पद्धतीने पार पडलेल्या या रेडिओ विंगच्या पहिल्या अधिवेशनाचा हा वृत्तांत...
नाशिक : रेडिओ विंगच्या माध्यमातून या क्षेत्रात कार्य करणाऱ्या पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी उभारण्यात आलेल्या लढ्याची मशाल धगधगती ठेवावी, असा नाशिक येथे आयोजित व्हॉईस ऑफ मीडिया रेडिओ विंगच्या राज्य अधिवेशनात मान्यवरांकडून उमटला.
व्हॉईस ऑफ मीडिया रेडिओ विंगच्या महाराष्ट्र राज्याचे अधिवेशन चार सत्रात पार पडले. यात रेडिओ क्षेत्रातील विविध समस्या संदर्भात विचार मंथन झाले. अधिवेशनात १० लाख रुपयांच्या विमा प्रमाणपत्रांचेही वितरण करण्यात आले. राज्य कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र आणि ओळखपत्र प्रदान करण्यात आले. रेडिओ क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्ती यांना पुरस्कारांचे वितरण यावेळी करण्यात आले. स्वातंत्र्यानंतर रेडिओ विंगच्या इतिहासात हा दिवस इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरला जाईल, असे विचार मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले.
नाशिक येथील मराठा विद्याप्रसारक समाजाचे कर्मवीर अॅडव्होकेट बापुराव गणपतराव ठाकरे कॉलेज ऑफ इंनिनीअरिंग मधील उदोजी मराठा बोर्डिंग कॅम्पस येथे व्हॉईस ऑफ मीडिया या संघटनेच्या रेडिओ विंगच्यावतीने रविवाार, ११ जूनला एकदिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन पार पडले. ज्येष्ठ पत्रकार विद्या विलास पाठक, व्हॉईस ऑफ मिडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, विश्वास गृप नाशिकचे संस्थापक अध्यक्ष विश्वास ठाकूर, चेतना व्यसनमुक्ती केंद्र जळगावचे संचालक नितीन विसपुते, सामाजिक कार्यकर्ते दिलीप धात्रक नाशिक, मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे, व्हॉईस ऑफ मीडिया रेडिओ विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष अमोल देशमुख, राष्ट्रीय कार्याध्यक्ष सचिन मेनकुदळे आणि राष्ट्रीय प्रवक्त्या रुचिता ठाकूर, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इरफान सय्यद, स्वागताध्यक्ष हरिभाऊ कुलकर्णी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
पहिल्या सत्रात अधिवेशनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. प्रदेशाध्यक्ष इरफान सय्यद यांनी अधिवेशनाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. एकदिवसीय अधिवेशनात आयोजित कार्यक्रमांची माहिती त्यांनी यावेळी दिली. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन संदीप देशमुख यांनी केले. आभार सायली जाधव यांनी मानले. दुसऱ्या सत्रात ‘राज्यातील रेडिओंची सद्य:स्थिती आणि भविष्यकालीन वाटचालीची दिशा’ या विषयावरील चर्चासत्रात उदय गोडबोले, महेश जगताप , युवराज जाधव , प्रांजळ आगिवाल यांनी आपले विचार व्यक्त केले. या सत्राचे सूत्रसंचालन रुचिता ठाकूर यांनी केले. आभार आशा मोरे यांनी मानले.
ठरवांवर झाले मंथन
तिसऱ्या सत्रात विविध विषयांवरील ठराव मांडण्यात आले. सर्वांच्या संमतीने अधिवेशनात ठरावांचा मसुदा मंजूर करण्यात आला. रेडिओ विंगला पत्रकारिता म्हणून अधिकृत मान्यता देण्यात यावी, स्टेशन इन्चार्ज वगळता पत्रकारितेत ज्या प्रकारे (संपादक, उपसंपादक ) पदांचा समावेश असतो, त्याप्रमाणे कर्मचाऱ्यांना समाविष्ट करावे. रेडिओतील पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती देण्यात यावी; स्वतःचे बातमीपत्र काढण्याची मान्यता मिळावी; सर्व कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा देण्यात यावा; शासनाकडे जी देयके (बिल) थकित आहेत त्याची रक्कम तत्काळ मिळावी; खासगी कंपनीचे प्रोजेक्ट व राज्य शासनाच्या योजनाच्या जाहिराती देण्यात याव्या; ट्रान्समीटर 500 वॉटचे देण्यात यावे या मुद्द्यांचा समावेश करण्यात आला.
राज्याची कार्यकारिणी जाहीर
चौथ्या सत्रात व्हॉईस ऑफ मीडिया रेडिओ विंग महाराष्ट्र राज्याची कार्यकारिणी अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष इरफान सय्यद यांचेसह २२ पदाधिकारी कार्यकारणीत आहेत. यात २ कार्याध्यक्ष महेश जगताप पुणे आणि गायत्री म्हस्के प्रवरानगर, ३ उपाध्यक्ष हरीश कुलकर्णी नाशिक, उदय गोडबोले सांगली आणि संदीप देशमुख रिसोड, सरचिटणीस सुनिल शिर्शिकर छत्रपती संभाजी नगर, सहसरचिटणीस अनुप गुरव सातारा, कोषाध्यक्ष जयंत कापडे नंदुरबार, २ कार्यवाहक नीता तुपारे पुणे आणि जगदीश भागात वर्धा, ५ संघटक समिर शिरवळकर अकोला, सविता जाधव पुणे, अनुजा मुळे्य अहमदनगर आणि माधुरी ढमाळे पुणे, प्रवक्ता देवानंद इंगोले वाशीम, प्रसिद्धी प्रमुख स्वामी पाटील जळगाव, ३ सदस्य संपना डोंगरे वाशीम, विक्रम पाटील मोठे रिसोड आणि सुरेश पाटील शिंदे येवती यांचा समवेश आहे.
पत्रकारांना विम्याचे कवच
नवनियुक्त पदाधिकारी आणि सदस्यांना यावेळी नियुक्तीपत्र, ओळखपत्र, १० लाख रुपयांचे विमा कार्डचे मान्यवरांच्या ह्सते वितरण करण्यात आले. प्रातिनिधिक स्वरूपात व्हॉईस ऑफ मीडिया रेडिओ विंगचे राज्याचे प्रसिद्धी प्रमुख तथा रेडिओ मनभावन जळगावचे आरजे स्वामी पाटील, बारामती रेडिओ तून राज्य उपाध्यक्ष आशा मोरे, ठाणे रेडिओचे श्रीपाद कुलकर्णी, कार्याध्यक्ष महेश जगताप, रेडिओ शुगरच्या धनश्री कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतातून अधिवेशन नियोजन आयोजन बाबत समाधान व्यक्त केले.
नवरत्नांचा गौरव
रेडिओ क्षेत्रासह आपापल्या कार्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नवरत्नांचा यावेळी सन्मान करण्यात आला. चार पत्र महर्षी पुरस्काराने रेडिओ विश्वास नाशिकचे विश्वास जयदेव ठाकूर, रेडिओ मनभावन जळगाव खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे, एमजीएम रेडिओ छत्रपती संभाजी नगरच्या डॉ. रेखा शेळके आणि माणदेशी रेडिओ म्हसवद साताऱ्याच्याचेतना सिन्हा यांना गौरविण्यात आले.
पाच पत्र श्री पुरस्काराने कम्युनिटी रेडिओच्या प्रश्नांवर प्रबंध आणि पी.एचडी. मिळविल्याबद्दल पुण्याचे डॉ. चैतन्य शिंदखेडे, ज्येष्ठ निवेदक दत्ता सरदेशमुख सांगली, एसबीसी ३ विविध प्रकल्पांच्या माध्यमातून कम्युनिटी रेडिओला आर्थिक मदत करण्याचे कार्य करणारे निशित कुमार मुंबई, आकाशवाणीचे ज्येष्ठ निवेदक जगदीश भगत वर्धा, आरजे रुद्र नाशिक यांना गौरविण्यात आले.
रेडिओ क्षेत्रात इतिहास घडेल : काळे
महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच रेडिओचे अधिवेशन घेण्यात आले. रेडिओ क्षेत्रात काम करणाऱ्या सहकाऱ्यांना विमा कवच, मुलांचे शिक्षण, घरकुल, नवे तंत्रज्ञान कौशल्य, सेवानिवृती नंतर आयुष्याचे नियोजन, अधिस्वीकृती यांसह विविध विषयांवर चर्चा करण्याची वेळ आली असल्याचे विचार यावेळी व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी नमूद केले. पत्रकारांचे व त्यांच्या परिवाराचे आशीर्वाद घेण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडिया सदैव कार्य करणार असल्याचे त्यांनी यावेळी ठळकपणे पुनश्च एकदा नमूद केले.
प्रश्नांचा पाठपुरावा करणार : देशमुख
शासन आणि प्रशासनस्तरावर रेडिओ माध्यमातील प्रश्नांचा तात्काळ पाठपुरावा केला जाणार आहे, असे मत रेडिओ विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष अमोल देशमुख यांनी यावेळी व्यक्त केले. राज्य अधिवेशनात रेडिओ क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांनी उपस्थित राहात आपल्या न्याय हक्कासाठी एकत्र आल्याबद्दल देशमुख यांनी आनंद व्यक्त केला.
अभुतपूर्व एकजूट : सय्यद
कम्युनिटी रेडिओच्या क्षेत्रात स्वातंत्र्यानंतर कधीही ईतकी एकजूट बघायला मिळाली नव्हती. व्हॉईस ऑफ मीडियाच्या छत्राखाली ही एकजूट बघायला मिळाली. हा क्षण अभुतपूर्व असाच आहे. कम्युनिटी रेडिओ आणि या क्षेत्रात काम करणाऱ्यांचे प्रश्न त्यामुळे निश्चित सुटतील असे वाटते, असे विचार रेडिओ विंगचे प्रदेशाध्यक्ष इरफान सय्यद यांनी व्यक्त केले.